बामणी येथे ३ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण
कागल (प्रतिनिधी): बामणी (ता. कागल) येथे सिद्धनेर्ली उपकेंद्रांतर्गत उभारण्यात आलेल्या तीन मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. हैद्राबादस्थित मेघा इंजिनियरिंग अँड ईन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्यावतीने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मतदारसंघात चार ठिकाणी सौर प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. कागल शहरात आवश्यक असल्यास भाडेतत्त्वावर जागा घेऊनही सौर प्रकल्प उभारण्यात येईल. ज्या भागांत जागेची अडचण आहे, त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामार्फत पाहणी करून अहवाल मागवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देताना होणारा त्रास आणि संभाव्य धोके टळणार असल्याचे सांगितले. दिवसा वीज देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून तो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरेल, असे ते म्हणाले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ प्रताप माने, तहसीलदार अमरदीप वाकडे, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, सदस्य दत्तात्रय दंडवते, जिल्हा परिषद सदस्य सुयशा घाटगे, सरपंच अनुराधा पाटील, उपसरपंच सुनीता पाटील, बाजार समितीचे चेअरमन नानासाहेब कांबळे, दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.




