बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या? धक्कादायक व्हिडीओ शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली..

बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या? धक्कादायक व्हिडीओ शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली..

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बिपाशा बासूनं एका न्यूट्रिशन प्रोडक्टचा व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये छोट्या-छोट्या अळ्या दिसत आहेत. बिपाशानं हा व्हिडीओ थेट महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केला आहे. या भेसळीच्या किंवा दूषित उत्पादनाच्या प्रकाराबाबत त्यांनी मदत करावी, अशी विनंती अभिनेत्रीने केली आहे. भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात कठोर कारवाई करावी, असं आवाहनही बिपाशा बासूनं तुकाराम मुंढे यांना केलं आहे.

 यापूर्वी अभिनेत्री श्वेता तिवारी हिनं ऑनलाइन मागवलेल्या ड्रिंकमध्ये झुरळ आढळल्याचा दावा केला होता. त्यावेळी तिनंही अशा निष्काळजीपणाविरोधात कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र एफडीए आयुक्तांकडे दाद मागितली होती. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूनं एका न्यूट्रिशन प्रोडक्टबाबत महाराष्ट्राचे एफडीए अधिकारी तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट केली आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रोटीन पावडर आणि त्यामध्ये असल्याचं दिसणाऱ्या अळ्या दाखवल्या आहेत.

 या व्हिडीओमध्ये बिपाशा प्रोटीन पावडर एका ग्लासमध्ये ओतते आणि त्यातील लहान अळ्या दाखवते. तिनं नुकतंच ते कंटेनर उघडलं होतं आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने अळ्या आढळल्याचा दावा केला आहे. अभिनेत्री एका कीटकाला आपल्या बोटावर घेऊन त्याचा क्लोज-अप शॉटही दाखवते. बिपाशा बासूनं तिच्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांना टॅग करत यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. मात्र, बिपाशा बासूनं व्हिडीओ शेअर करत केलेल्या या दाव्याची अद्याप स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही.

 बिपाशानं व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, "तुकारामजी, आम्हाला भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा निकृष्ट दर्जाची उत्पादनं मिळू नयेत, यासाठी आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात." अभिनेत्रीचा हा व्हिडीओ पाहून युजर्सनाही धक्का बसला आहे. मात्र या तक्रारीनंतर एफडीएकडून संबंधित न्यूट्रिशन ब्रँडवर काही कारवाई करण्यात आली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 महाराष्ट्र अन्न सुरक्षा विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे सध्या त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे चर्चेत आहेत. अन्नातील भेसळ आणि रेस्टॉरंटमधील अस्वच्छतेविरोधात त्यांनी कठोर पावलं उचलली आहेत. विविध रेस्टॉरंट्सची तपासणी करून अन्नसुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आणून देत कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात राबवलेल्या धडक कारवायांच्या मोहिमेमुळे तुकाराम मुंढे यांच्या कामाचं विविध स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेकजण त्यांना रिअल-लाइफ हिरो असंही संबोधत आहेत.

 दरम्यान, बिपाशा बासूच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, लग्नानंतर आणि आई झाल्यानंतर अभिनेत्रीने इंडस्ट्रीपासून काहीसं अंतर राखलं आहे. गेल्या काही वर्षांत तिचा सिनेसृष्टीतील वावरही कमी झाला आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डेंजरस' या सीरिजमध्ये ती अखेरची दिसली होती. बिपाशानं अभिनयातून काहीसा ब्रेक घेतला असला, तरी तिचा पती करण सिंह ग्रोव्हर मात्र इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.