भंडाऱ्यात भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू; वर्मा कुटुंबातील चौघांसह उईके कुटुंबातील आई आणि दोन चिमुकले काळाच्या पडद्याआड
मुंबई (प्रतिनिधी) : भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव येथे काल, 11 सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात घटनास्थळी 8 जणांचा, तर उपचारासाठी नेत असताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातग्रस्तांची ओळख पटवण्यात आली आहे. या भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील आई, चिमुकली, आजी आणि आणखी एका महिला नातेवाईक अशा चौघांचा मृत्यू झाला. तर उईके कुटुंबातील आईसह तिच्या दोन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत झाला. यासोबतच अन्य तीन महिलांचा या अपघातात मृत्यू झाल्याने एकूण पाच चिमुकले आपल्या आईच्या प्रेमाला मुकले आहेत.

हे सर्व अपघातग्रस्त छत्तीसगडमधून बोलेरो वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी हा भीषण अपघात घडला. अपघातातील 13 जखमींपैकी काहींवर भंडारा आणि नागपूर येथे उपचार सुरू आहेत, तर किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळगाव आणि मुंडीपार गावादरम्यान हा अपघात झाला. नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या बोलेरो वाहनामध्ये चालक, महिलांसह 10 बालक असे एकूण 22 जण प्रवास करत होते. पिंपळगाव येथील पेट्रोल पंपावरून बाहेर पडलेल्या आयशर ट्रकला भरधाव बोलेरोने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत 6 महिला आणि 3 बालकांचा मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले असून त्यातील काही जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर भंडारा आणि नागपूर येथील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. किरकोळ जखमींना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. दरम्यान, या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या आयशर ट्रक चालक अमरसिंग यादव आणि बोलेरो पिकअप वाहन चालक जगु उर्फ जगदेव वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत आणि जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न देता घटनास्थळावरून पसार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
तसंच, ज्या द्वारका पेट्रोल पंपावरून आयशर ट्रक राष्ट्रीय महामार्गावर आला, त्या पेट्रोल पंपाच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियम आणि अटींचं पालन न केल्याचा आरोप आहे. या तिघांविरोधात लाखनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या भीषण अपघातातील मृतांमध्ये जामबाई वर्मा (50), मीनाक्षी वर्मा (26), ग्रीशा वर्मा (2), गायत्री उईके (30), स्वीटी उईके (6), धैर्य उईके (4), सरिता वर्मा (30), राजकुमारी पटले (35) आणि गणेशया पटले (22) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे वर्मा आणि उईके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पाच चिमुकल्यांनी आपल्या आईला कायमचं गमावलं आहे.




