भारत-अमेरिका व्यापार कराराची शक्यता; मोदींसोबतचे संबंध मजबूत असल्याचे ट्रम्प यांचे विधान
मुंबई (प्रतिनिधी) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार संबंधांबाबत भाष्य करताना, भारताने अनेक वर्षे अमेरिकेवर उच्च आयात शुल्क लादल्याचे सांगितले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अमेरिका टॅरिफमधून चांगला महसूल मिळवत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच महत्त्वाचा व्यापार करार होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

ट्रम्प म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत.आमचे संबंध अतिशय सकारात्मक आहेत आणि आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतो." त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चांना गती मिळू शकते,असे संकेत त्यांनी दिले.
हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाने नुकतीच नवी दिल्लीत भारतीय अधिकाऱ्यांसोबत व्यापारविषयक अनेक फेऱ्यांची चर्चा केली आहे. दोन्ही देश प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि परस्पर फायद्याचा अंतरिम व्यापार करार अंतिम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने चर्चांना सकारात्मक स्वरूप असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, व्यापार वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकेने काही देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सक्तीच्या मजुरीविरोधात पुरेशी पावले न उचलणाऱ्या देशांवर हे शुल्क लागू करण्याचा विचार असून, प्रस्तावित यादीत भारताचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यास अमेरिकेत निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर 12.5 टक्के अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते.
तथापि, भारत सरकारने स्पष्ट केले आहे की या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. अमेरिकेकडून जनतेचा आणि संबंधित घटकांचा अभिप्राय घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
याआधी फेब्रुवारी 2026 मध्ये भारत आणि अमेरिका अंतरिम व्यापार कराराच्या चौकटीवर सहमत झाले होते. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या काही टॅरिफ निर्णयांवर न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर कराराच्या प्रक्रियेत काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली. त्यामुळे हा करार अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही.




