भावना दुखावल्याप्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार करणार; विद्यानंद बापट म्हणाले, ‘भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला’

भावना दुखावल्याप्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार करणार; विद्यानंद बापट म्हणाले, ‘भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला’

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील विद्यानंद बापट यांची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट चर्चेत आले आहेत. त्यातच काल विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला.पुण्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल पथकांच्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट हे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देत असतानाच त्यांना मारहाण करण्यात आली. याच प्रकरणावर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या मागणीला विरोध करणाऱ्यांना आव्हान दिलं आहे.

विद्यानंद बापट म्हणाले की, “माझा जो लढा आहे, तो तसाच सुरू राहील. सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करायचा असेल, तर ध्वनी प्रदूषण होता कामा नये. मी कोण आहे, हा मुद्दा नाही. प्रतिवाद करता येत नाही म्हणून असे प्रश्न निर्माण केले जात आहेत. ध्वनीप्रदूषण तुम्ही लादताय. प्रतिवाद करता येत नाही म्हणून मारहाण केली जात आहे.”“रविवारच्या मोर्चात मी सहभागी होणार आहे. जिवंत असेल तर नक्की त्या मोर्चाला जाईन. केव्हा काय होईल सांगता येत नाही. जाण्याजोगा असेल तर नक्की जाईन. माझा लढा असाच सुरू राहणार. बऱ्याच मंडळांनी मिरवणुका काढल्या आहेत. मिरवणुका बंद केल्या तरी फरक पडत नाही. मिरवणूक काढायची असेल तर शहराबाहेरून काढावी,” असंही बापट यांनी म्हटलं आहे.

काल झालेल्या मारहाणीबाबत बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, भारतात अमेरिकेसारखा शस्त्र बाळगण्याचा अधिकार स्वसंरक्षणासाठी हवा. अमेरिकेत लोक बाहेर पडतानाही शस्त्र बाळगतात, आपल्याकडे तसं नाही, असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, वेगवेगळ्या गणेश मंडळांकडून पोलिसांना विद्यानंद बापट यांच्या विरोधात तक्रार देण्यात येणार आहे. विद्यानंद बापट यांनी भावना दुखावल्या, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केली आणि सार्वजनिक शांततेला बाधा आणली, असा आरोप करण्यात येत आहे.

याबाबत बोलताना विद्यानंद बापट म्हणाले की, “भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला. भावना ही दुखायची गोष्ट नाही. तार्किक प्रतिवाद करता येत नाही म्हणून कांगावा केला जात आहे. माझ्या रोजगारावर गदा आणू नका असं म्हणता येणार नाही,” असंही बापट यांनी म्हटलं आहे. ध्वनी प्रदूषण आणि उत्सवाबाबत विद्यानंद बापट यांनी उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदूषणावर आणि डीजेच्या वापरावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सर्वच धर्मांच्या उत्सवांमध्ये आवाजावर मर्यादा असणे गरजेचे आहे. ध्वनी प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कोलाहलात संवाद साधणे किंवा विचार मांडणे अशक्य होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा सर्वात आधी हाताळणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आत्मसंरक्षण आणि शस्त्राधिकाराची भूमिका मांडताना विद्यानंद बापट म्हणाले की, भारतातही अमेरिकेतील दुसऱ्या घटनादुरुस्तीप्रमाणे सार्वत्रिक शस्त्राधिकारासारखा मूलभूत अधिकार असावा, अशी आपली भूमिका आहे. स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणे आणि रस्त्यावर शस्त्र दाखवून दहशत निर्माण करणे यात मोठा फरक आहे. पुण्यात ‘कोयता गँग’सारख्या घटनांमधून होणारे शस्त्रप्रदर्शन हे गुन्हेगारी कृत्य आहे, त्याचा आत्मसंरक्षणाशी काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या भूमिकेमुळे आपल्यावर फॅसिस्ट असल्याचा आरोप केला जात असल्याचं सांगत त्यांनी तो आरोप फेटाळला. अस्मितांच्या नावावर समाजात फूट पाडणारे खरे फॅसिस्ट असतात आणि आपण त्याचा तीव्र विरोध करतो, असं बापट यांनी म्हटलं.

गणेशोत्सवातील आवाजाच्या मर्यादा या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवण्यात आल्या आहेत. जर कोणाला या नियमांना आव्हान द्यायचं असेल, तर त्यांनी न्यायालयात जावं, असंही बापट म्हणाले.मूर्ती विसर्जनामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणावर बोलताना त्यांनी शाडूच्या मूर्ती वापरण्याबाबत उच्च न्यायालयानेही सरकारला सुनावल्याचं सांगितलं. उत्सवातील ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण या दोन्ही समस्या तितक्याच गंभीर आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

‘भावना दुखावणे’ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलताना बापट म्हणाले की, आपल्या भूमिकेमुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात, हा आरोप केवळ तक्रार किंवा कांगावा आहे. समोरच्या मताचा तार्किक प्रतिवाद करता येत नाही, म्हणूनच असा कांगावा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघानेही अशा प्रकारच्या ईशनिंदा किंवा भावना दुखावण्यासंबंधीच्या जाचक कायद्यांना हटवण्याची शिफारस केल्याचं त्यांनी सांगितलं.इतिहासाचा दाखला देताना त्यांनी सांगितलं की, लोकमान्य टिळकांच्या काळात सार्वजनिक उत्सव सुरू झाले, तरी न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी बुद्धीप्रामाण्यवादाचे विचार मांडले होते. हिंसाचाराचा आधार न घेता प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचं पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असंही बापट यांनी स्पष्ट केलं.

वैयक्तिक पार्श्वभूमी आणि नास्तिकतेबाबत बोलताना बापट म्हणाले की, कोकणातील रत्नागिरीच्या परंपरेनुसार त्यांच्या घरीही पूर्वी गणपती बसवला जात असे. मात्र, त्याचा आजच्या नास्तिकतेवर कोणताही प्रभाव पडत नाही. जगभरातील प्रसिद्ध नास्तिक विचारवंत, उदाहरणार्थ रिचर्ड डॉकिन्स किंवा डॅन बार्कर, हे लहानपणी धार्मिक वातावरणातच वाढले होते. मात्र, वयानुसार आणि बुद्धीप्रामाण्यवादातून त्यांची नास्तिकता विकसित झाली, असं सांगत त्यांनी आपल्या जीवनदृष्टीची मांडणी केली.