मतदानाआधीच अंतिम भूमिका जाहीर करणार; सातारा-सांगली निवडणुकीत महायुतीचा पेच कायम – शंभूराज देसाई
सातारा (प्रतिनिधी) : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असताना महायुतीतील अंतर्गत मतभेद अद्याप पूर्णपणे मिटलेले नसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यात मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली."आमचा अंतिम निर्णय मतदानाच्या अगोदर घेतला जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्देश देतील, त्यानुसार आम्ही भूमिका घेऊ," असे देसाई यांनी सांगितले.

बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपापली मते आणि भावना पक्षाच्या कोअर कमिटीसमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले. या सर्वांचा सविस्तर अहवाल पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील तिढा सुटल्याच्या चर्चांबाबत बोलताना, "अद्याप आमच्यापर्यंत कोणताही अधिकृत निर्णय पोहोचलेला नाही," असे त्यांनी नमूद केले.भाजप नेत्यांकडून कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगत देसाई म्हणाले, "भाजप बहुमताच्या जवळ आहे. आम्ही महायुतीच्या चौकटीत राहून काम करू, मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच घेतला जाईल."
भाजपने आपल्या मतदारांना अज्ञातस्थळी हलवल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, शिवसेनेचे सदस्य कुठेही पाठवलेले नाहीत आणि सर्व सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित होते.दरम्यान, भाजपच्या बैठकीत आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीबाबत विचारले असता, ते महायुतीचे घटक असल्याने त्या बैठकीत सहभागी झाले होते, असे देसाई यांनी स्पष्ट केले. वैयक्तिक कारणांमुळे ते शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
'ऑपरेशन टायगर' आणि ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर बोलताना देसाई यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. "कोल्ह्याला द्राक्ष आंबट" अशी त्यांची अवस्था झाली असून ते मनाला वाटेल ती वक्तव्ये करत असल्याची टीका त्यांनी केली.तसेच, शिवसेनेतून अद्याप कोणीही बाहेर गेलेले नसल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनी संशय बाळगण्याचे कारण नसल्याचे म्हटले. मात्र, राजकारणातील अशा घडामोडी अत्यंत गोपनीयपणे पार पडतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतरच समोर येतात, असे सूचक विधानही त्यांनी केले.




