मनोज जरांगे उपोषणावर ठाम; आता ब्राह्मण समाजाचे नेतेही उपोषणाच्या तयारीत
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारचे तीन मंत्री काल (सोमवारी, ता. 24) मनोज जरांगे यांच्या समजुतीसाठी गेले होते. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत. याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आपली भूमिका मांडली.मनोज जरांगे सातत्याने 58 लाख नोंदी आणि मराठा समाजाला आरक्षण का मिळाले पाहिजे, याबाबत भूमिका मांडत आहेत. मात्र या नोंदी आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नसून 1986 ते 2023 या कालावधीत शोधण्यात आल्याचे तायवडे यांनी सांगितले. आंदोलनाचा संबंध ऑक्टोबर 2023 नंतरचा आहे, असंही ते म्हणाले.

तायवडे यांच्या मते, संपूर्ण महाराष्ट्रातून 58 लाख नोंदी सापडल्याचं सरकार सांगत आहे. त्यापैकी 51 लाख 71 हजार जणांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचंही सांगितलं जातं. मात्र एका कुटुंबातील अनेक व्यक्तींना प्रमाणपत्र मिळाल्याने या आकडेवारीत पुनरावृत्ती असल्याचा दावा त्यांनी केला. मराठवाड्यात ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 3 लाख 11 हजार दाखले देण्यात आले असून, त्यापैकी केवळ 20 हजार जणांनी वैधतेसाठी अर्ज केला आणि 15 हजार जणांना वैधता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात मागण्यांवर एकवाक्यता झालेली नसल्याने ते उपोषणावर ठाम असल्याचं तायवडे यांनी म्हटलं. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, हीच आमची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनीही भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदीच्या आधारे कुणबी दाखले देण्याची मागणी करण्याऐवजी ओबीसी उप-वर्गीकरणाची मागणी करावी, असं राठोड यांनी म्हटलं. यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवता येईल, असा त्यांचा दावा आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता ब्राह्मण समाजाचे नेतेही उपोषणाच्या तयारीत आहेत. सरकारला उपोषणाच्या भाषेशिवाय दुसरी भाषा कळत नाही, असा आरोप सकल ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रणनवरे यांनी केला आहे. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून जालना येथे उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ब्राह्मण समाजाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप रणनवरे यांनी केला. समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याने उपोषणाची वेळ आली असल्याचं ते म्हणाले. जालना येथील गांधी चमन येथे हे उपोषण करण्यात येणार आहे.ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर असल्याचं रणनवरे यांनी सांगितलं. मुलींप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत करावे, अशी मागणी त्यांनी केली. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला अडीच वर्षे झाली, मात्र अद्याप कर्मचारी आणि अशासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
या महामंडळातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, तसेच ईडब्ल्यूएसची मर्यादा आठ लाखांवरून 15 लाख रुपये करावी, अशीही मागणी त्यांनी केली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ब्राह्मण समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह असावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.गेल्या दोन वर्षांपासून ब्राह्मण समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागत आहे, मात्र वेळ दिला जात नसल्याचा आरोपही दीपक रणनवरे यांनी केला. त्यामुळे आता 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.




