मराठा मंत्रालयाच्या मागणीवरून जरांगेंचा सरकारला इशारा; 'त्या' 9 मंत्र्यांची नावं 29 ऑगस्टला जाहीर करणार

मराठा मंत्रालयाच्या मागणीवरून जरांगेंचा सरकारला इशारा; 'त्या' 9 मंत्र्यांची नावं 29 ऑगस्टला जाहीर करणार

मुंबई (प्रतिनिधी) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारकडून योग्य निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करत त्यांनी 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाज एकवटला असल्यामुळे आता पुढील लढा काळजीपूर्वक आणि ताकदीने लढायचा आहे. मराठा समाजाच्या 58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी जरांगे पाटील यांनी दावा केला की, नऊ ओबीसी मंत्री एकत्र आले होते आणि त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, 29 ऑगस्ट रोजी या नऊ मंत्र्यांची नावं जाहीर करणार आहे.

जरांगे पाटील म्हणाले, ओबीसी समाजासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती आहे आणि त्याचे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीला विरोध का केला जातो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय मिळाल्यास प्रत्येक जिल्ह्यात सुविधा उपलब्ध होतील आणि समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी राहील, असेही त्यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी मराठा समाजातील तरुणांना शिक्षण आणि प्रशासनातील संधी मिळण्याची गरज व्यक्त केली. सरकार कोणाचेही असो, आपल्या मुलांना अधिकारी बनवा. अधिकार आपल्या लेकरांच्या हातात आले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, मराठा समाजासाठी असलेल्या सारथीच्या योजनांबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. सरकार योजना सुरू असल्याचे सांगत असले तरी विद्यार्थ्यांकडून वेगळी माहिती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.

जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री 15 मिनिटांत मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाचा निर्णय घेऊ शकतात, असे म्हणत सरकारला लक्ष्य केले. तसेच मराठा समाजाच्या मागण्यांवर आता सरकार आणि समाज यांच्यात निर्णायक लढा होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, जरांगे पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष आहे.