मुंबईतील खासदार फुटला, ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा

मुंबईतील खासदार फुटला, ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू असून, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्रीवर ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी 12 वाजता होणाऱ्या या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका, कार्यकर्त्यांच्या भावना आणि पुढील रणनीती यावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, दिल्लीत झालेल्या संसदीय दलाच्या बैठकीला पक्षाच्या सहा खासदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाचा व्हीप धुडकावून हे खासदार गैरहजर राहिल्याने ते शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अधिकच जोर धरत आहे.बैठकीला केवळ चार खासदार उपस्थित राहिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. पक्षाने गैरहजर खासदारांना नोटीस बजावून सात दिवसांत स्पष्टीकरण मागितलं आहे.

विशेष म्हणजे, ईशान्य मुंबईत मजबूत संघटनात्मक जाळं असतानाही खासदाराने बंडखोरी केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचं बोललं जात आहे. यामुळे आता त्या भागातील पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदारांनंतर आता मुंबईतील स्थानिक नेतृत्वावरही इतर पक्षांची नजर असल्याची चर्चा रंगत असताना, उद्धव ठाकरे यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतून नेमका कोणता संदेश दिला जातो आणि पुढील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.