मुंबईत पावसाचे थैमान; मानखुर्दमध्ये ३ मजली चाळ कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

मुंबईत पावसाचे थैमान; मानखुर्दमध्ये ३ मजली चाळ कोसळून ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

मुंबई : मुंबई मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच एक दुर्दैवी घटना घडली आहे. मानखुर्द येथील जनता नगर परिसरात रविवारी रात्री जळमजला अधिक तीन मजली चाळीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी आहे.

ही दुर्घटना रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथील जनता नगर परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामागील चाळ क्रमांक ५ मध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीतील दोन ते तीन घरांचा भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी यंत्रणांनी भर पावसात तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.

या दुर्घटनेत पाच जणांना महापालिकेच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर एक जणाचा घाटकोपर येथील राजावाडी रूग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तींची ओळख अजून पटलेली नाही.