मुंबई पोलीस दलातच कोट्यवधींचा वेतन घोटाळा? साडेसहा कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप, 5 जणांवर गुन्हा
मुंबई (प्रतिनिधी) : मोठी बातमी समोर आली आहे. अनेक मोठ्या घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस दलातच कोट्यवधी रुपयांचा वेतन घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांचे वेतन आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासनाच्या तब्बल साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी नसलेल्या काही व्यक्तींना कर्मचारी दाखवून त्यांच्या बँक खात्यांवर वेतनाच्या रकमा पाठवण्यात आल्याचा आरोप आहे.

उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाची फसवणूक, कट रचणे आणि पुरावे नष्ट करणे अशा विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या 'सेवार्थ' वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना ही अनियमितता समोर आली. त्यानंतर करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये 2019 आणि 2020 मधील काही महिन्यांच्या वेतन रकमांमध्ये मोठी तफावत आढळून आली.
तपासात काही अशा व्यक्तींच्या नावावर वेतन काढण्यात आल्याचं समोर आलं आहे, जे प्रत्यक्षात पोलीस दलात कार्यरतच नव्हते. त्यांच्या खात्यावर पैसे कसे आणि कोणाच्या माध्यमातून पाठवले गेले, याचा आता पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणात रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले यांच्यासह काही व्यक्तींच्या नावावर वेतन काढल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन प्रशासकीय अधिकारी आणि काही लिपिकांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, धुळे आणि लातूर येथे झालेल्या कथित वेतन घोटाळ्यांशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. आता या चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




