मुंबई भेटीनंतर शिंदेंचा मोठा डाव; संदेश पारकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई भेटीनंतर शिंदेंचा मोठा डाव; संदेश पारकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई (प्रतिनिधी)  : ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर सध्या मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही गोष्ट उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना समजल्यानंतर ते काल वेळात वेळ काढून संजय दिना पाटील यांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी फोर्टिस रुग्णालयात पोहोचले होते. एकनाथ शिंदे आणि संजय दिना पाटील यांच्या भेटीची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. यानंतर आता कोकणातून एक महत्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे.

कणकवली नगरपालिकेचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेत लवकरच शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेशही करणार असल्याचं सांगणयात येत आहे. कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून शहर विकास आघाडीच्या पाठिंब्याने संदेश पारकर हे कणकवली नगरपालिका नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नगरपालिकेच्या निवडणुकीच्यावेळी राज्यभरात या कणकवली पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली होती. कणकवली नगरपालिका नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी ठाकरेंचे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख पद सोडल्यानंतर शिंदे शिवसेनेसोबत जाणार अशी मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. शहराच्या विकासासाठी आपल्याला कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागणार, अशी माहिती संदेश पारकर यांनी दिली आहे. 

संदेश पारकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील एक प्रमुख राजकारणी आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून ते निवडून आले होते, मात्र सध्या ते शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण राणे आणि नितेश राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून संदेश पारकर कोकणात ओळख आहे. डिसेंबर 2025 च्या निवडणुकीत त्यांनी शहर विकास आघाडीतर्फे लढून नगरपंचायत निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. संदेश पारकरांनी नगरपालिकेच्या या निवडणुकीत भाजपचे (नितेश राणे समर्थित) उमेदवार समीर नलावडे यांचा पराभव करून मोठा विजय मिळवला होता.  

संदेश पारकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात काँग्रेसमधून केली होती. नारायण राणे शिवसेनेत होते. त्यावेळी सिंधुदुर्गात राणेंचे वर्चस्व होते. प्रत्येक सत्ता केंद्र राणेंच्या ताब्यात होते. त्याच वेळी कणकवली नगरपरिषदत संदेश पारकर यांनी एकहाती आपल्या हातात ठेवली होती. राणेंना त्यांच्याच गावातील नगरपरिषद जिंकता आली नव्हती. याची सल नेहमीच राणे यांना राहीली आहे. राणे यांना टोकाचा राजकीय विरोध संदेश पारकर यांनी केला होता. पारकर यांनी काँग्रेस प्रमाणे राष्ट्रवादी, भाजपनंतर शिवसेनेत काम केले आहे.