'मोदी हैं तो मुमकिन हैं' वाद पुन्हा चर्चेत; डिलीट केलेल्या कमेंटचा स्क्रीनशॉट व्हायरल, राजकुमार रावची भूमिका स्पष्ट
मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर NEET-UG प्रकरणावरील पोस्टखाली केलेल्या आणि नंतर डिलीट केलेल्या एका कमेंटमुळे त्याच्यावर चर्चा रंगली आहे. त्या कमेंटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी 'मोदी हैं तो मुमकिन हैं' या गाण्यात दिसल्यामुळे राजकुमार रावला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर त्याने अलीकडेच NEET-UG वादावर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणे, शांततापूर्ण संवाद आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेची गरज यावर त्याने भर दिला.
या पोस्टखाली एका युजरने, "मी आधी तुमचा खूप आदर करत होतो, पण 'मोदी हैं तो मुमकिन हैं' या गाण्यात काम केल्यानंतर तो आदर संपला," अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या एका युजरनेही राजकुमार राववर तडजोड केल्याचा आरोप केला. या टीकेला उत्तर देताना राजकुमार रावने सविस्तर प्रतिक्रिया दिली होती. जरी ही कमेंट नंतर डिलीट करण्यात आली असली, तरी तिचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजकुमार रावने आपल्या उत्तरात म्हटले की, "मी कधीही माझा आत्मा विकणार नाही. एका गाण्यावरून माझे विचार, माझी तत्त्वे किंवा मी कोण आहे, हे ठरत नाही. किती दबाव असतो, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मी नेहमी लोकांना एकत्र आणणाऱ्या आणि योग्य वाटणाऱ्या गोष्टींच्या बाजूने उभा राहिलो आहे. जे मला वैयक्तिकरित्या ओळखतात, त्यांना मी कसा माणूस आहे हे माहिती आहे. मला आशा आहे की, एक दिवस मी तुमचा आदर पुन्हा मिळवू शकेन.
राजकुमार रावची ही प्रतिक्रिया आणि त्यानंतर कमेंट डिलीट करण्याचा निर्णय यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.




