'या' कारणामुळे ‘धुरंधर’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात

'या' कारणामुळे ‘धुरंधर’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात

मुंबई - बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट “धुरंधर” प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. अशोक चक्र पुरस्कार विजेते शहीद मेजर मोहित शर्मा यांच्या पालकांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत चित्रपटाचे प्रदर्शन तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी समोर येत आहे.

याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटाची कथा त्यांच्या मुलाच्या जीवनावर आधारित असल्याचे दिसते, परंतु चित्रपट निर्मात्यांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. याचिकेत माहिती व प्रसारण मंत्रालय (MIB), सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC), भारतीय लष्कर तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांना पक्षकार करण्यात आले आहे.

‘धुरंधर’ च्या ट्रेलरमधून चित्रपट भारत - पाकिस्तान गुप्तचर पार्श्वभूमीवर आधारित असल्याचे दिसते. यामध्ये दहशतवादविरोधी मोहिमा आणि गुप्तचर कारवाया दाखवल्या आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांनीही हा चित्रपट एका वास्तविक घटनेने प्रेरित असल्याचे जाहीर केले आहे. ट्रेलरमध्ये रणवीर सिंग पाकिस्तानमधील गुप्तहेर किंवा भारतीय लष्करी जवानाची भूमिका साकारताना दिसतो. मेजर मोहित शर्मा यांच्या पालकांचा दावा आहे की कथानक त्यांच्या मुलाच्या जीवनाशी साम्य दर्शवते.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत सारा अर्जुन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. रणवीर सिंगचा लूक व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तो शहीद मेजर मोहित शर्माची भूमिका साकारत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.