राज्याचा 8.8 टक्के विकासदर चांगला, पण 10 टक्क्यांचा टप्पा ओलांडायचाय; देवेंद्र फडणवीसांचा विकासाचा रोडमॅप

राज्याचा 8.8 टक्के विकासदर चांगला, पण 10 टक्क्यांचा टप्पा ओलांडायचाय; देवेंद्र फडणवीसांचा विकासाचा रोडमॅप

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. राज्याचा सध्याचा 8.8 टक्के विकासदर चांगला असला, तरी महाराष्ट्राला 10 टक्क्यांहून अधिक विकासदराचा टप्पा गाठायचा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हे 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणारे पहिले राज्य असेल. हे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र सध्या राज्याचा ग्रोथ रेट 8.8 टक्के आहे. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्यासाठी विकासदर आणखी वाढवण्याची गरज आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक राज्ये 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पाहत आहेत. मात्र आज त्या स्वप्नाच्या सर्वात जवळ कोण असेल, तर ते महाराष्ट्र आहे. कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 660 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे आणि आपण ट्रिलियन डॉलरच्या अगदी जवळ आहोत.“आपण शाश्वत विकासदर कायम ठेवला, तर निश्चितपणे 2030 मध्ये महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जगातील अनेक अर्थव्यवस्था दोन ते अडीच टक्क्यांनी विकसित होत असताना आणि एवढं मोठं तेलाचं संकट निर्माण झाल्यानंतरही भारत 7.8 टक्के, तर महाराष्ट्र 8.8 टक्क्यांनी विकास करत आहे.“अर्थातच आपल्याला डबल डिजिट ग्रोथची अपेक्षा आहे. आपला नॉमिनल ग्रोथ रेट हा 11 टक्क्यांच्या जवळ आहे. त्यामुळे आपण डबल डिजिटमध्ये आहोत. मात्र 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जायचे असेल, तर केवळ नॉमिनल ग्रोथ रेटचा विचार करून चालणार नाही. त्यासाठी इन्फ्लेशन आणि एक्सचेंज रेटचा विचार करून समतोल साधावा लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत 8.8 टक्के हा चांगला विकासदर आहे. मात्र आमचा प्रयत्न निश्चितपणे असा असेल की, आपण 10 टक्क्यांच्या वर गेले पाहिजे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.दरम्यान, 2030 पर्यंत महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल का, असा प्रश्न विचारण्यात आला असता फडणवीस म्हणाले की, ज्यावेळी 1 ट्रिलियन डॉलरची घोषणा करण्यात आली, त्यावेळी डॉलर आणि रुपयांचा जो एक्सचेंज रेट होता, त्यानुसार विचार केला तर कदाचित 2029 मध्येच हे लक्ष्य गाठले गेले असते.

मात्र सध्याच्या ऑईल क्रायसिसमुळे एक्सचेंज रेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. आपले लक्ष्य 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे आहे. त्यामुळे डॉलरची व्हॅल्यू जशी बदलते, त्यानुसार हे लक्ष्यही पुढे-मागे होत राहते.“मला अपेक्षा आहे की 2030 मध्ये आपण हे लक्ष्य पूर्ण करू शकू. कदाचित थोडंसं राहिलं तर 2031 मध्ये ते पूर्ण होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.