रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षभराची मुदत का दिली? कारण आलं समोर
मुंबई (प्रतिनिधी) : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठीबाबत घेतलेला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलला आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी आता एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे.रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठी शिकण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, मात्र त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. ही मागणी मान्य करत मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याआधी १५ ऑगस्टनंतर परिवहनमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी ही मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवली आहे. या निर्णयामागचे कारणही आता समोर आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये निर्माण झालेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका वर्षाची मुदत देण्याचा निर्णय घेतला. हाजी अराफत शेख यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती. रिक्षाचालक मराठी शिकण्यास तयार असल्याची हमीही त्यांनी बैठकीत दिली.
अल्पावधीत कोणतीही भाषा शिकणे सहज शक्य नसते, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याने एक महिन्याऐवजी एका वर्षाची मुदत देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच, मराठीबाबत चुकीची किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचे व्हिडिओ करून ते सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांना बदनाम करू नयेत, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.बैठकीत हाजी अराफत शेख म्हणाले की, "मराठीचा आम्हाला आदर आहे. मी देहू-आळंदीचा राहणारा आहे आणि तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की, तुम्ही एक दिलदार मुख्यमंत्री म्हणून आमच्या रिक्षाचालकांच्या आणि टॅक्सीचालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल."
काही संघटना आणि काही पक्षांकडून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवंडी, वांद्रे टर्मिनस, कुर्ला टर्मिनस आणि विविध रेल्वे स्थानकांवरून रिक्षाचालक बैठकीसाठी आले होते. हे सर्व रिक्षाचालक मराठी शिकणार असतील, तर आम्हाला एक वर्षाची मुदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी त्यांनी मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करत "लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..." या ओळींचाही उल्लेख केला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. "तुम्ही सगळे शिकू इच्छिता, हे मला चांगले वाटले. जुजबी का होईना, मराठी शिकली पाहिजे, यावर सगळ्यांची संमती आहे, याचा मला आनंद आहे," असे ते म्हणाले.भाषा शिकण्यासाठी कमी वेळ पुरेसा नसतो, त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांना जुजबी मराठी शिकवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असेल, तर शासनाकडून त्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर मराठीबाबत वाईट बोलणाऱ्या काही व्यक्तींमुळे संपूर्ण रिक्षा-टॅक्सीचालक समाज बदनाम होऊ नये, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशातील सर्व भाषा चांगल्या आहेत आणि प्रत्येकाने आपल्या सर्व भाषांचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. मात्र, आपल्या मातृभाषेचा अधिक स्वाभिमान ठेवला पाहिजे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सीचालकांना एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय पूर्ण विचारांती आणि घटकपक्षांशी चर्चा करूनच घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या मुद्द्यावर भूमिका एकच असल्याचे सांगितले जात आहे.




