वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी): कै.वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे शुक्रवार दिनांक 12 ते रविवार दिनांक 14 जून 2026 पर्यंत, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक व शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या माध्यमातून भव्य ऑल इंडिया खुल्या एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 250 पेक्षा जास्त नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

ही स्पर्धा कोल्हापुरातील राजोपाध्ये नगर येथील बॅडमिंटन हॉल येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे या स्पर्धेमध्ये तीन माजी विश्वविजेते,दोन आशियाई विजेते, चार जूनियर चॅम्पियनशिप जिंकणारे 17 वर्षाखालील खेळाडू तसेच महिला खेळाडू व मुलींचा लक्षणीय सहभाग आहे. या स्पर्धेतील विजेत्याला रोख रुपये 75000 व शारंग चषक तसेच उपविजेत्या खेळाडूस रोख रुपये 50 हजार व शारंग चषक,तृतीय क्रमांक रोख रुपये 25000 व शारंग चषक,चतुर्थ क्रमांक रोख रुपये 15000 व शारंग चषक तसेच 5 ते 16 क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी रोख बक्षीसासह आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमध्ये माजी विश्वविजेते योगेश परदेशी, संदीप दिवे, रियाज अकबरअली यांच्यासह कोल्हापुरातील नामवंत खेळाडू व विश्वचषक स्पर्धेतील क्रमांक तीन ठरलेला अभिजीत त्रिपणकर, आशियाई विजेते प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय विजेते संजय मांडे यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंच्या खेळाची झलक कोल्हापूरवासियांना अनुभवायला मिळणार आहे. स्पर्धमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जेवणाची व राहण्याची गटनेते शारंगधर देशमुख व स्पर्धा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. तरी कोल्हापुरातील तमाम कॅरम प्रेमींनी व क्रीडा रसिकांनी या स्पर्धा पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




