विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर आमनेसामने! सभागृहात गोंधळ

विधान परिषदेत बच्चू कडू-प्रवीण दरेकर आमनेसामने! सभागृहात गोंधळ

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेत आज बच्चू कडू आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. मंत्री बोलत असताना बच्चू कडू वारंवार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत प्रवीण दरेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.दरेकर म्हणाले की, मंत्री उत्तर देत असताना सतत मध्ये बोलणे योग्य नाही. चित्रा वाघ मुद्दा मांडत असताना त्यांनाही व्यत्यय आणला जात आहे. सभागृहाच्या कामकाजात असा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावर बच्चू कडू यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. "मी बोलायचे का नाही, हे तुम्ही सांगणारे कोण? सभापती बोलत असतानाही तुम्ही मध्ये बोलता, ते योग्य आहे का?" असा सवाल त्यांनी प्रवीण दरेकरांना केला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करत प्रश्न नेमके आणि मुद्देसूद विचारावेत तसेच संबंधित मंत्री उत्तर देत असताना त्यांचे म्हणणे पूर्ण ऐकून घ्यावे, अशा सूचना दिल्या.राम शिंदे यांनी सांगितले की, अन्यायाविरोधात आवाज उठवणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. मात्र मंत्री उत्तर देण्यापूर्वीच अनेक सदस्य उभे राहून मध्ये बोलू लागतात, ही पद्धत योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावही मांडला आहे. सभागृहात वारंवार चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रस्ताव सादर केला. यावर सभापती राम शिंदे यांनी संबंधित विभागाकडून खुलासा मागवला असून तो आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.एकूणच, विधान परिषदेतील बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यातील हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.