व्होटचोरी'साठी SIRचा वापर, निवडणुका हायजॅक करण्याचा भाजपचा डाव; पोलिसांवरही ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने निवडणुका 'हायजॅक' करण्यासाठी निवडणूक आयोगाचा वापर केला, तसेच मतदार यादीतून लाखो नावे बेकायदेशीरपणे काढून 'मते चोरण्यासाठी' SIRचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, भाजप बंगालमध्ये विभाजनकारी राजकारण करत असून लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहे. तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त ममता बॅनर्जी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोलकाता येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित केलं.

टीएमसीच्या राजवटीत पोलिसांना मानवी चेहरा होता, मात्र भाजपने पोलिसांना एका राक्षसी संस्थेत बदललं आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. आपल्या समर्थकांवरील 'पोलिसांचा अत्याचार' आपण थांबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा आपला रक्षाबंधन संकल्प असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या.ममता बॅनर्जी यांनी भाजपवर बंगालमध्ये विभाजनकारी राजकारण करण्याचा आणि पोलिसांच्या माध्यमातून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, जर सभांना परवानगी दिली नाही, तर लवकरच संपूर्ण राज्याचा दौरा सुरू करून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे.
फुटपाथवरून फेरीवाल्यांना हटवण्यास माझी हरकत नाही, मात्र त्यांना पर्यायी जागा दिली पाहिजे. जर सरकार ते करू शकत नसेल, तर त्यांना दरमहा 25 हजार रुपयांची भरपाई दिली पाहिजे, अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.तसंच, 'त्यांनी किती अंडी आणि विटा साठवून ठेवल्या आहेत ते मी बघेन,' असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.




