शरद आयुर्वेदचा योग दिनानिमित्त 'रन फॉर योग' मॅरेथॉन
यड्राव (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे 'रन फॉर योग' मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मॅरेथॉनमध्ये संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "प्रत्येकाने आपले जीवनमान निरोगी व संतुलित ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांचे संतुलन राखणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम आणि दैनंदिन शारीरिक हालचाल यांचा अंगीकार केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी जीवन जगण्याची जीवनपद्धती आहे."
शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज परिसरातून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. सहभागी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी योग आणि आरोग्याविषयी जनजागृती करणारे संदेश देत उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.




