शाहू प्रबोधिनी तर्फे आर्मी आणि पोलीस भरतीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

शाहू प्रबोधिनी तर्फे आर्मी आणि पोलीस भरतीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

कोनवडे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील तरुणांना सैन्य आणि सुरक्षा दलात करिअर करता यावे, यासाठी कोनवडे (ता. भुदरगड) येथील महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त 'राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी'ने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. "एक पाऊल मातीसाठी" या भावनेतून प्रबोधिनीने १०० निवडक विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: मोफत निवासी ग्राउंड प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाची माहिती संस्थेचे संस्थापक आणि पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव यांनी दिली आहे.

आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, रेल्वे आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत उपयुक्त संधी आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, निवड झालेल्या १०० पात्र युवकांसाठी प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, नाष्ट्याची आणि जेवणाची मोफत सोय केली जाणार आहे. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष ग्राउंड ट्रेनिंग दिले जाईल.

अशी असेल प्रवेश प्रक्रिया व पात्रता:

प्रशिक्षण कालावधी: हे प्रशिक्षण १५ जुलै २०२६ पासून सुरू होणार असून ते १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत (अंदाजे २ ते ३ महिने किंवा आर्मी भरतीची ग्राउंड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत) चालणार आहे.

पात्रता निकष: उमेदवार अग्निवीर लेखी परीक्षा उत्तीर्ण असावा, त्याची उंची किमान १६८ सेमी असावी. तसेच तो कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

नोंदणीची मुदत: इच्छुक उमेदवारांनी ९ जुलै ते १४ जुलै २०२६ या कालावधीत नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण: बाळूमामा मंदिराजवळ, आदमापूर (कोनवडे), ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.

संस्थेचे संस्थापक राजेंद्र गुरव यांनी स्पष्ट केले की, या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हा उपक्रम पूर्णपणे सेवाभावी स्वरूपात राबवला जात आहे. देशसेवेची जिद्द बाळगणाऱ्या जास्तीत जास्त तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ९०७५९१३४६१ व ९४०४८८३४६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.