शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा, कर्ज नियमित फेडणाऱ्यांनाही 'बक्षीस'
मुंबई (प्रतिनिधी) :शेतकरी बांधवांसाठी आजची घोषणा मोठा दिलासा देणारी ठरली आहे. विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे.

२ लाखांपर्यंत कर्जमाफी : ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे कि जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
राज्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभतेमुळे महाराष्ट्राची स्पर्धात्मकता वाढली आहे. "आपण २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी काही विशेष उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत," असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांत संतुलित वाढ राखल्यानेच राज्याला ७.९ टक्क्यांचा विकास दर गाठणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




