सक्षम ताटे प्रकरण : आंचल मामिडवारने घर सोडण्यामागचे कारण सांगितले; सक्षमच्या भावावर गैरवर्तनाचा आरोप
नांदेड (प्रतिनिधी) : सक्षम ताटे हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेली आंचल मामिडवार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सक्षमच्या घरातून ती अचानक निघून गेल्यानंतर विविध चर्चा सुरू होत्या. याबाबत आता आंचलने माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आंचल मामिडवारने दावा केला की, सक्षमच्या लहान भावाकडून तिच्याशी गैरवर्तन होत होते. ही बाब तिने कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या तक्रारीवर विश्वास ठेवला गेला नाही. त्यामुळे पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तिने पोलिसांना माहिती देऊन सक्षमचे घर सोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, सक्षमची आई संगीता ताटे यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना आंचल आजीला भेटण्यासाठी गेली आणि त्यानंतर परत आली नाही, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आंचलने आपली बाजू मांडत घर सोडण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर होत असलेल्या टीका आणि ट्रोलिंगबाबतही आंचलने नाराजी व्यक्त केली. संपूर्ण सत्य जाणून न घेता कोणावरही आरोप करू नयेत, असे आवाहन तिने केले. तसेच सक्षमच्या वडिलांचे निधन आजारपणामुळे झाल्याचेही तिने स्पष्ट केले.




