सलमान खानचा पूरग्रस्त पंजाबसाठी 'हा' मदतीचा हात तर सोनूसूदही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला

सलमान खानचा पूरग्रस्त पंजाबसाठी 'हा' मदतीचा हात तर सोनूसूदही धावला पूरग्रस्तांच्या मदतीला

मुंबई – बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा आपल्या सामाजिक जाणीवेने चर्चेत आला आहे. मदतीसाठी नेहमी तत्पर असलेला सलमान यावेळी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा देवदूत ठरला आहे. राज्यातील अनेक भाग सध्या पूराच्या तडाख्यात असून हजारो लोक बेघर झाले आहेत. या गंभीर परिस्थितीत सलमान खानने आपले योगदान देत पाच नौका पंजाबला पाठवल्या आहेत.

याशिवाय, फिरोजपूरजवळील हुसैनीवाला परिसरातील काही पूरग्रस्त गावे सलमान खान दत्तक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या ‘बीइंग ह्यूमन’ फाउंडेशनमार्फत या गावांचा पुनर्विकास केला जाणार आहे.

पंजाब टुरिझमचे चेअरमन यांनी खुद्द पूरग्रस्त फिरोजपूर भागाचा दौरा केला. त्यांनी सांगितले की, सलमान खानच्या एनजीओकडून पाठवण्यात आलेल्या पाच नौका स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यातील दोन नौका फिरोजपूर बॉर्डरवरील आपत्कालीन सेवेसाठी वापरण्यात येतील, तर उर्वरित तीन नौका राज्यातील इतर भागांत मदत आणि बचाव कार्यात उपयोगात आणल्या जातील.

दरम्यान, अभिनेता सोनू सूदनेही पूरग्रस्त भागाला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत लिहिले, "पंजाबसोबत, नेहमीसाठी. आम्ही जमिनीवर होतो, नुकसान पाहिलं, मन तुटलं. गावे पाण्याखाली गेली, आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण अजूनही लोकांची जिद्द टिकून आहे. जे काही हवं, आम्ही इथे आहोत मदतीसाठी, पुनर्निर्माणासाठी, आणि या जखमा भरून काढण्यासाठी."