साईराम हॉस्पिटलतर्फे उचगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
उचगाव (प्रतिनिधी) : वैद्यकीय क्षेत्रात निरंतर कार्यरत राहून डॉ. मंगेश माने व डॉ. मेघना माने यांनी उचगावच्या ग्रामस्थांची गेली आठ वर्षे निरपेक्ष सेवा केली आहे. आपल्या उत्कृष्ट आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी साईराम हॉस्पिटलचे नाव उज्ज्वल केले आहे, असे प्रतिपादन उचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण यांनी केले.उचगाव येथील साईराम हॉस्पिटलच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईगडे (एन. डी.) हे होते.

कार्यक्रमाची सुरुवात जि. प. सदस्य नामदेव वाईंगडे व सरपंच मधुकर चव्हाण यांच्या हस्ते स्व. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन बाळगून डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवाजीराव माने, डॉ. मंगेश माने व डॉ. मेघना माने यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, "साईराम हॉस्पिटलने ग्रामपंचायत कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेले हे शिबिर अत्यंत कौतुकास्पद आहे. या तपासणीमुळे अनेकांच्या शारीरिक व्याधींवर वेळीच उपचार होण्यास मदत होईल. साईराम हॉस्पिटल हे उचगाव आणि परिसरातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड बनले असून, हॉस्पिटलची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी."
प्रास्ताविक करताना डॉ. मंगेश माने यांनी सांगितले की, उचगाव हे क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. दिवसरात्र सेवा बजावताना कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. याच उद्देशाने त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जावी म्हणून या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील व श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते, तेव्हापासून गेली ८ वर्षे आरोग्य सेवा हाच धर्म मानून रुग्णसेवा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरादरम्यान ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 'युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग' आणि 'ओम हॉस्पिटल' यांच्या सहकार्याने मोफत रक्त तपासणी, ईसीजी (ECG), नेत्र तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबिराचा सर्वाधिक लाभ ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतला व या सामाजिक उपक्रमाबद्दल हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले.
या प्रसंगी उपसरपंच अरविंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर रंगराव चव्हाण, विनायक हावळ, ग्रामपंचायत सदस्य विराग करी, पृथ्वीराज चव्हाण, समुपदेशक प्रल्हाद कांबळे, आरोग्य मित्र मोहन सातपुते, जनसंपर्क अधिकारी पांडुरंग कांबळे, राहुल कांबळे यांच्यासह साईराम हॉस्पिटलचे सर्व वैद्यकीय व बिगर-वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




