MAHA TET-2025: AI प्रणालीद्वारे तोतया उमेदवारांची ओळख पटणार

MAHA TET-2025: AI प्रणालीद्वारे तोतया उमेदवारांची ओळख पटणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET - 2025) येत्या रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 42 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. यावर्षी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी अत्याधुनिक AI तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून ‘फोटो व्ह्यू’ या नव्या AI प्रणालीद्वारे तोतया उमेदवारांची ओळख पटवली जाणार आहे. तसेच परीक्षार्थींकडे मोबाईल असल्यास हॅन्डहोल्ड डिटेक्टरद्वारे तपासणी होणार आहे. प्रशासनाने बायोमॅट्रीक नोंदणी, फेस रेकग्निशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित लाईव्ह मॉनिटरिंग सुरू केले आहे. परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत मूळ ओळखपत्र अनिवार्य आहे.

सतर्क परीक्षा यंत्रणा - 

जिल्हा प्रशासनाने परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा नियंत्रण कक्ष आणि परीक्षा परिषद कार्यालय यांना जोडणारी हॉटलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तासह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

42 केंद्रांवर 20,839 परीक्षार्थी - 

कोल्हापूर शहरातील 42 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

पेपर 1: 12,193 विद्यार्थी – 21 केंद्रे

पेपर 2 : 7,646 विद्यार्थी – 42 केंद्रे

एकूण 20,839 उमेदवार परीक्षा देणार आहेत.

तोतया उमेदवारांवर लक्ष - 

दुबार अर्ज, समान फोटो असलेले भिन्न नावांचे अर्ज, किंवा वेगवेगळ्या केंद्रांवरील विसंगती शोधून बोगस उमेदवारांना ओळखण्याची प्रक्रिया केली जाईल.

बायोमॅट्रीक व फेस-स्कॅनिंग अनिवार्य - 

पूर्वीप्रमाणेच बायोमॅट्रीक पडताळणी कायम ठेवण्यात आली असून यासोबतच फेस स्कॅनिंगही लागू केले आहे. सर्व शिक्षकांसाठी परीक्षा बंधनकारक असल्याने परीक्षार्थींची संख्या मोठी आहे.

1 तास आधी केंद्रात हजेरी आवश्यक - 

डीजिटल तपासणी प्रक्रियेमुळे वेळ लागू शकतो म्हणून नियोजित वेळेपेक्षा किमान 1 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लेखनिक किंवा अतिरिक्त वेळ मागणाऱ्या दिव्यांग उमेदवारांच्या प्रस्तावांची पडताळणी करून केंद्र संचालकांना सूचना पाठविण्यात आल्या आहेत. शंका असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर यांनी केले.