'कारभारी लयभारी'ची ऑनस्क्रीन जोडी अखेर खऱ्या आयुष्यात एकत्र

'कारभारी लयभारी'ची ऑनस्क्रीन जोडी अखेर खऱ्या आयुष्यात एकत्र

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकार अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी अखेर खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. साखरपुड्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर या लोकप्रिय जोडीने नव्या आयुष्याची सुरुवात करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

लग्नासाठी अनुष्काने पारंपरिक नऊवारी साडी परिधान केली होती, तर निखिलने धोतर आणि कुर्ता असा मराठमोळा पेहराव केला होता. विशेष म्हणजे, डोक्यावर तुळस आणि हातात भगवा ध्वज घेऊन दोघांनी लग्नमंडपात केलेली आगळीवेगळी एन्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या खास क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

याआधी हळद, मेहंदी आणि संगीत समारंभातील त्यांच्या उत्साही क्षणांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. चाहत्यांसह अनेक कलाकारांनी या नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.अनुष्का आणि निखिल यांनी 'कारभारी लयभारी' मालिकेत एकत्र काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. निखिलला 'लागीर झालं जी' मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली, तर अनुष्का सध्या 'वचन दिले तू मला' मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.