गडहिंग्लज–नेसरी मार्ग बंद ; भडगावजवळील पर्यायी पूल खचला
गडहिंग्लज (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम असून, यामुळे काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुसळधार पावसामुळे गडहिंग्लज–नेसरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भडगाव येथील मुख्य पुलाला जोडणाऱ्या पर्यायी पुलाचा काही भाग अचानक खचल्याने प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे.
पुलाचा भाग खचल्यामुळे या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील वाहतूक रोखली आहे.

प्रशासनाचा 'हा' पर्यायी मार्ग
नेसरी आणि परिसराकडे जाणाऱ्या वाहनधारकांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. नागरिकांनी नेसरी किंवा गडहिंग्लजकडे जाण्यासाठी 'आजरा' मार्गाचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा
सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम नसल्यास या भागातील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.




