जिल्हा परिषदेच्या सीईओ यांची सर्व विभागांना भेट; संबंधित विभागांना योग्य त्या सूचना
कोल्हापूर( प्रतिनिधी) जिल्हा परिषदेत नुकत्याच हजर झालेल्या नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी आज जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना भेट दिली. या वेळी त्यांनी सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, बांधकाम विभाग, वित्त विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पाणी व स्वच्छता विभाग इत्मादी सर्व वभिागांना भेटी दिल्या.

त्याचबरोबर रेकॉर्ड विभाग या ठिकाणीही भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सर्व विभागांनी त्यांच्या विभागांचे नामफलक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कार्यविवरण आणि नस्ती यांची यादी लावणे, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे आणि ओळखपत्र वापरण्याबाबत, अनावश्यक फाईल्सचे गठ्ठे अभिलेख कक्षात वर्ग करणे, हालचाल रजिस्ट्र नोंद करणे, कार्यालयीन साफसफाई करणे याबाबत सूचना केल्या.
त्यांच्या भेटीदरम्यान काही कर्मचारी अनुपस्थित होते त्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणे बाबत निर्देश दिले. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहाला भेट देवून पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, ग्रामीण पाणी पुरवठाचे अर्जुन गोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट आदी खातेप्रमुख उपस्थित होते.




