'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' प्रा. स्वाती कोरी यांना प्रदान

'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' प्रा. स्वाती कोरी यांना प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कै. सौ. हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट, राज प्रकाशन व राजर्षी शाहू अध्यासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा 'पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार' प्रा. स्वाती महेश कोरी यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल, कोल्हापुरी फेटा व रोख ५००० रुपये असे आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन येथे झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. सतेज पाटील आणि माजी आ. के. पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालकल्याण संकुलचे ज्येष्ठ विश्वस्त सुरेश शिपुरकर होते, तर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक वसुधा पवार, गुंफण अकादमीचे अध्यक्ष बसवेश्वर चेणगे आणि श्रीराम ज्ञानपीठचे संस्थापक - अध्यक्ष बी. ए. पाटील प्रमुख उपस्थित होते.

तसेच पवार ट्रस्टचे संस्थापक, ज्येष्ठ अर्थतज्ञ, प्राचार्य डॉ. जे. के. पवार लिखित "राजर्षी शाहू महाराज: संक्षिप्त चरित्र" या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक लेखक प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांनी केले. पुरस्काराला उत्तर देताना प्रा. स्वाती कोरी म्हणाल्या, "समाजहितासाठी सुरू असणारी लढाई लढण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा व बळ देणारा ठरेल. आमचे आजोबा दिनकरराव शिंदे यांनी समाजकार्याचे दिलेले संस्कार हे आमची पिढी पुढे जपत आहे." 

यावेळी पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी आ. सतेज पाटील म्हणाले, "फुले - शाहू - आंबेडकरांचे विचारच समाजस्वास्थ टिकवतील. त्यांचे विचार - कार्य आणि खरा इतिहास पुढच्या पिढीला समजण्यासाठी अशा चरित्र पुस्तकांचे डिजिटायझेशन होणे गरजेचे आहे." 

माजी आ. के. पी. पाटील म्हणाले, "राजर्षी शाहूंचा समतेचा विचार समाजविघटनास पायबंद घालण्यास उपयुक्त आहे. नव्या पिढीने राजर्षींच्या विचार व कार्याचा आदर्श घ्यावा. महिलांसाठी स्वातीताई कोरी या प्रेरणा शक्ती आहेत."

ट्रस्टचे सचिव प्रा. डॉ. दिग्विजय पवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. गणेश लोळगे यांनी केले. 

यावेळी शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. स्वाती कोरी यांनी पुरस्काराची मिळालेली रक्कम पाच हजार आणि त्यामध्ये स्वतः आणखी पाच हजार रुपये अशी एकूण दहा हजार रुपयांची मदत कोल्हापुरातील बालकल्याण संकुलला देत असल्याचे यावेळी जाहीर केले.