माजी विद्यार्थी आणि अशोकराव माने ग्रुपचा ऋणानुबंध अधिक दृढ - विजयसिंह माने

माजी विद्यार्थी आणि अशोकराव माने ग्रुपचा ऋणानुबंध अधिक दृढ - विजयसिंह माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सन २०१३ ते २०२० या कालावधीतील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि एमबीए या विविध विभागांतील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव माने शिक्षण समूहाचे अध्यक्ष विजयसिंह माने उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. प्रवीण घेवारी, संचालक प्रा. डॉ. संगीता चौगुले, एमबीएचे प्रभारी संचालक डॉ. सागर सुतार, संस्थेच्या एचआर प्रियांका सुतार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. अमोल पाटील यांनी केले.

या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये तसेच उच्च पदांवर कार्यरत असलेल्या १६ माजी विद्यार्थ्यांचा “प्रेस्टीजियस ॲल्युमनी” म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी काॅग्निंझंटमधील सिनियर असोसिएट दिपाली खोपकर, टेक महिंद्राचे सिनियर क्वालिटी ॲशुरन्स इंजिनिअर सागर महापुरे, कॉग्निझंटमधील सिनिअर साॅफ्टवेअर डेव्हलपर सुमेध जाधव, व्हीव्हीडीटी टेक्नाँलॉजीचे सिनिअर टेक्निकल लीड शेखर पाटील, कोल्ते-पाटील ग्रुपचे असिस्टंट मॅनेजर अभिजित पाटील, प्रसिद्ध उद्योजक अजिंक्य पोळ या निवडक माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना महाविद्यालयीन जीवनातील शिक्षण, संस्कार, ज्ञान, कौशल्यविकास, औद्योगिक दृष्टीकोन आणि मिळालेल्या संधी आजच्या व्यावसायिक जीवनात किती उपयुक्त ठरत आहेत, याबाबत कृतज्ञ भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर न बनवता जबाबदार, सक्षम आणि उद्योगाभिमुख व्यक्तिमत्त्व घडविले, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थाध्यक्ष विजयसिंह माने म्हणाले की, ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार तंत्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच संस्थेच्या शैक्षणिक कार्याची खरी पोचपावती आहे. मागील काही वर्षांत महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी उच्च प्रतीच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या असून विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्रोत आणि रोल मॉडेल म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या मेळाव्यामुळे महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी यांच्यातील ऋणानुबंध अधिक दृढ झाले असून भविष्यात विद्यार्थी विकास, उद्योगसंपर्क, मार्गदर्शन आणि संस्थेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कॅम्पस डायरेक्टर प्रा. प्रवीण घेवारी यांनी महाविद्यालयाच्या अलीकडील सर्वांगीण प्रगतीचा आढावा मांडला. त्यांनी महाविद्यालयात झालेल्या नवनवीन बदलांची, जगविख्यात गुगल कंपनीच्या सहकार्याने विकसित पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव एआय पॉवर्ड डिजिटल कॅम्पस, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील सामंजस्य करार, विद्यार्थ्यांना परदेशातील इंटर्नशिप व प्लेसमेंटच्या संधी, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब, सेंटर ऑफ एक्सलन्स, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, संशोधन व नवोपक्रम यांसारख्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालय विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्याच्या दिशेने सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाच्या संचालक प्रा. डॉ. संगीता चौगुले यांनी ॲल्युमनी सेलद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. माजी विद्यार्थ्यांचे अनुभव, तांत्रिक ज्ञान, उद्योगातील प्रत्यक्ष कार्यानुभव आणि करिअर मार्गदर्शन सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते, असे सांगून त्यांनी माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक, कौशल्याधारित आणि उद्योग-संलग्न उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डीन स्टुडंट अफेअर्स डॉ. जयदीप शिंदे तर सूत्रसंचालन प्रा. गणेश लोळगे यांनी केले. या मेळाव्यास महाविद्यालयाचे डीन, विभागप्रमुख, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी, प्राध्यापकवर्ग तसेच माजी विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.