वारणा विद्यापीठ अंतर्गत लॉ कॉलेजला मान्यता
वारणानगर (प्रतिनिधी) - वारणा विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात आणखी एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू होणाऱ्या वारणा स्कूल ऑफ लॉ महाविद्यालयाला बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे.

महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सीईटी पोर्टल वर ऑप्शन फॉर्म भरताना वारणा स्कूल ऑफ लॉ (इन्स्टिट्यूट कोड ३५००१) निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथे तीन वर्षांचा LL.B. (पदवीधरांसाठी) तसेच पाच वर्षांचे B.A., LL.B. आणि B.B.A., LL.B. (१२ वी नंतर एकात्मिक अभ्यासक्रम) असे दोन्ही प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध राहणार असून, प्रवेश महाराष्ट्र CET द्वारेच होणार आहे.
कायदा शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी न्यायालयीन सेवा, कायदेशीर सल्ला देण्याचे क्षेत्र, सरकारी नोकऱ्या, कॉर्पोरेट क्षेत्रातील कायदेशीर जबाबदाऱ्या तसेच उच्च शिक्षण व संशोधन यामध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी महाविद्यालयात अनुभवी प्राध्यापकवर्ग, सुसज्ज मूट कोर्ट हॉल, समृद्ध ग्रंथालय, आधुनिक पायाभूत सुविधा, तसेच इंटर्नशिप आणि प्लेसमेंटचे मार्गदर्शन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या यशस्वी उपक्रमामागे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन व पाठबळ, आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळातील विविध पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.




