शरद पवार–एकनाथ शिंदे भेटीवरून राजकीय वाद; शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण
सातारा (प्रतिनिधी) : शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील भेटीनंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ही भेट पूर्णपणे औपचारिक होती, त्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचा दावा त्यांनी केला.

शशिकांत शिंदे म्हणाले, सीमावादासंदर्भातील समितीच्या बैठकीनंतर शरद पवार काही वेळ एकनाथ शिंदे यांच्या विधिमंडळातील दालनात थांबले. प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. त्या ठिकाणी अनेक आमदार आणि खासदारही उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी या भेटीवर आक्षेप घेत "गद्दारांच्या छताखाली बैठक का?"असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, विधानभवनातील दालने ही वैयक्तिक नसून विधिमंडळाची आहेत. राजकारणात अशा औपचारिक भेटी होत असतात. पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र प्रवास करत होते, त्यावेळी आम्ही कधीही आक्षेप घेतला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शरद पवार गट एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावल्या. पक्षातील सर्व आमदार आणि खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर ठाम असून एनडीएमध्ये जाण्याचा कोणताही विषय पक्षात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेली बैठक शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी असल्याचे म्हटले. शरद पवार यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा विषय असला, तरी अशा भेटींमुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.




