शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी आई अंबाबाईची 'या' रूपातील सालंकृत पूजा
कोल्हापूर (प्रतिनिधी) - साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज आई अंबाबाईला सकाळी साडेसहा, साडेआठ व साडेअकरा वाजता देवीला नित्यअभिषेक करण्यात आला. सकाळी 9 वाजता मानकरी जाधव घराण्यातील सदस्याकडून तोफेची सलामी देण्यात आली. त्यानंतर शासकीय पूजेने नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. आज दुपारी दोन वाजता आई अंबाबाईची महाविद्या श्री कमलालक्ष्मी माता रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

दहा दिवसांच्या काळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षा व सुविधेसाठी जय्यत तयारी केली आहे. रोज पालखीसह पंचमी, नगर प्रदक्षिणेचा सोहळा नवरात्रोत्सवात आई अंबाबाईची रोज रात्री साडेनऊ वाजता पालखी मिरवणूक काढली जाते. फुलांनी सजवलेली पालखी गरुड मंडपातून मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर काढली जाते. हजारो भाविकांच्या साक्षीने होणाऱ्या या पालखी सोहळ्यासाठी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. ललिता पंचमीदिवशी अंबाबाई त्र्यंबोली भेटीचा सोहळा तर अष्टमीदिवशी देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा होणार आहे.




