अनुसूचित जातींच्या आरक्षणात हस्तक्षेप नको; उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकरांचा सरकारला इशारा

अनुसूचित जातींच्या आरक्षणात हस्तक्षेप नको; उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकरांचा सरकारला इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणात कोणताही हस्तक्षेप करू नये. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप केला.

आनंदराज आंबेडकर म्हणाले की, या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन सुरू असून परभणी, पिंपरी-चिंचवड, लातूर, मुंबईनंतर आता सोलापुरातही मोर्चा काढण्यात आला आहे. मातंग, खाटीक आणि इतर समाजातील प्रतिनिधीही या आंदोलनात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी "महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य आहे," अशी टीका केली. तसेच, कोणतीही राजकीय युती ही निवडणुकीपुरती असते आणि आपल्या पक्षाबाबत चुकीची माहिती पसरवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले यांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची टीका केली.

आनंदराज आंबेडकर यांनी इशारा दिला की, महाराष्ट्रात उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात रस्त्यावरचे आंदोलन आणि कायदेशीर लढा अशा दोन्ही मार्गांनी संघर्ष केला जाईल. त्यांनी लोकशाहीत जनताच सर्वोच्च असल्याचे सांगत सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आवाहनही केले.