अमरावतीत वाघिणीची दहशत; 24 तासांत दोघांचा मृत्यू,नवनीत राणांना अश्रू अनावर
मुंबई (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात वाघिणीच्या दहशतीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे 22 वर्षीय तरुणीचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर आता शिरजगाव कसबा परिसरात एका शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.अवघ्या 24 तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

चांदूरबाजार आणि मोर्शी तालुक्यातील विविध भागांत या वाघिणीचा वावर असल्याचं सांगितलं जात आहे. मागील काही दिवसांपासून वाघिणीने अनेक जनावरांची शिकार केल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे रविवारी 6 सप्टेंबर रोजी उर्मिला बाजीराव इवने या 22 वर्षीय तरुणीवर वाघिणीने हल्ला केला. उर्मिला आपल्या आईसोबत गावाजवळील शेतात शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेली होती. चारा कापत असताना अचानक वाघीण त्यांच्या दिशेने येताना दिसली.
वाघीण जवळ येत असल्याचं लक्षात येताच उर्मिलाची आई जीवाच्या आकांताने गावाच्या दिशेने पळाली. तरुणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघिणीने तिच्यावर हल्ला करून तिला झाडावरून खाली खेचलं. यानंतर वाघिणीने उर्मिलाला सुमारे 15 ते 20 फूट झुडपांमध्ये फरफटत नेलं. उर्मिलाच्या आईने गावात जाऊन आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांचा गोंधळ ऐकून वाघीण तेथून पळून गेली. मात्र, तोपर्यंत उर्मिलाचा मृत्यू झाला होता.
यानंतर शिरजगाव कसबा परिसरातील म्हैस डोक जंगलात दामू आवारे यांच्यावर वाघिणीने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 24 तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आणखी वाढलं आहे. दरम्यान, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मृत उर्मिलाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी उर्मिलाची आई आणि बहीण यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबीयांची अवस्था पाहून नवनीत राणाही भावूक झाल्या आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले.
परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत नवनीत राणा यांनी वाघिणीला पकडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, ड्रोन कॅमेऱ्यात वाघीण दिसत नसल्याने तिचा ठावठिकाणा शोधण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांनी वाघिणीचा शोध घेण्यासाठी चॉपरचा वापर करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वनमंत्री आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती आहे. ड्रोन कॅमेऱ्यात वाघीण दिसत नसल्याने चॉपरच्या मदतीने तिचा शोध घेऊन तिला ठार करावं, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. वाघिणीच्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभाग आता कोणती पावलं उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




