'फडणवीसांनी राज ठाकरेंकडून प्रचार करून घेतला अन् त्यांच्याच पोराला पाडलं'; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : देवेंद्र फडणवीस राज्यातील जनतेवर मोगलाईपेक्षाही वाईट काळ आणू शकतात, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. फडणवीस राजकारणी आणि उद्योगपतींना ईडीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करत असून, त्यांना वाटेल त्या पद्धतीने केसेस केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसांची मग्रुरी आणि हुकूमशाही मराठा राजकारणी सहन करत असतील, तर त्यांना जाब विचारला पाहिजे. एवढा मग्रूर शासक राज्याला परवडणारा नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

भाजपमधील नेत्यांनीही ही बाब समजून घ्यावी. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची फडणवीसांकडून काय अवस्था केली जात आहे, हेही खोलात जाऊन पाहा, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. सोमवारी अंतरवाली सराटी येथे बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबतही भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्याकडून प्रचार आणि भाषणं करून घेतली. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांच्याच मुलाला निवडणुकीत पाडलं, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
फडणवीसांनी भाजपमधील काही लोकांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तिकीटं द्यायला लावली. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांचे असे 10 ते 12 आमदारच आहेत, असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांचाही फडणवीसांनी राजकारणात वापर करून घेतला, असंही जरांगे पाटील म्हणाले.भाजपकडून सातत्याने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने मराठा समाजासाठी काय केलं, असा सवाल केला जातो. मात्र, तुम्ही सत्तेत असून मराठा समाजासाठी काय केलं, असा प्रतिप्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
अत्याचाराचं आंदोलन मोडणारा राज्यकर्ता संपवावा लागतो, तेव्हाच राज्य सुखी होतं, असं म्हणत जरांगे पाटील यांनी रामायण आणि महाभारतातील उदाहरणांचा उल्लेख केला. रावणाचा रामाने वध केला आणि प्रजा सुखी झाली. कौरवांचा अत्याचार पांडवांनी मोडून काढला आणि ते सुखी झाले. अत्याचार झाला म्हणून कंसाचा वध करावा लागला. कालियाने समुद्र दूषित केला म्हणून कृष्णाला त्याचा वध करावा लागला, अशी उदाहरणंही त्यांनी दिली.
बिनरक्तपाताचा जगाच्या पाठीवर इतिहास होऊ शकत नाही, असं म्हणत जरांगे पाटील यांनी शिंदे-फडणवीसांवरही निशाणा साधला. शिंदे-फडणवीसांची मिलीभगत असल्याचा आरोप करत आपल्याला एक निरोप मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकडे जाताना आंदोलकांना अडवलं किंवा हल्ला केला, तर मिळालेली माहिती खरी असल्याचं समजायचं आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं, असं जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईकडे जाताना अडवलं नाही, तर फडणवीसांविरोधातील मिळालेली माहिती चुकीची होती, असं समजायचं. मात्र काही घडलं, तर माहिती खरी होती, असं समजायचं, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी 12 तारखेला सर्वांनी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. तारीख निश्चित झाल्यानंतर मुंबईकडे निघायचं, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.




