अमित शाह आज तरी संसदेत येणार? चार विधेयके होणार सादर; राहुल गांधींचा गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज (10 ऑगस्ट) लोकसभेत चार विधेयके सादर केली जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन विधेयके मांडणार आहेत. यामध्ये केरळ (नाव बदल) विधेयक, 2026 आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ कायदा, 1962 मध्ये सुधारणा करणारे विधेयक यांचा समावेश आहे. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, 2026 सादर करतील. तर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी खाण आणि खनिज (विकास आणि नियमन) कायदा, 1957 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मांडतील. राज्यसभेत बँकर्स बुक्स अँड एव्हिडन्स बिल, 2026 वर चर्चा होणार असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे विधेयक सभागृहात सादर करतील.

दरम्यान, 20 जुलै रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याच्या घटनेनंतर अमित शाह संसदेत उपस्थित न राहिल्याने विरोधकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या 15 दिवसांपासून विरोधकांकडून चर्चेची मागणी केली जात असतानाही अमित शाह यांनी संसदेत प्रवेश केलेला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे आज अमित शाह संसदेत येण्याची शक्यता असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना गर्भित इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत अमित शाह यांनाही टॅग केलं आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, तेरा दिवस उलटून गेले, मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून एक शब्दही आलेला नाही. माफी मागण्याऐवजी मोदी क्षमादान वाटत आहेत. अमित शाह, आम्ही जबाबदारीची मागणी करणे थांबवू, असे समजू नका. राजधानीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांना लाठीमार आणि पेलेट्सने मारहाण झाली, तरी तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत. आज नाही तर उद्या, तुम्हाला या घटनेसाठी उत्तर द्यावेच लागेल. विद्यार्थी हे राष्ट्राचा प्रकाश आहेत आणि मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे.
राहुल गांधी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आता माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही,” असं प्रयागराजमधील एका विद्यार्थ्याने त्यांना सांगितलं. वर्षानुवर्षे तयारी, घर विकणे, आई-वडिलांचे कर्ज फेडणे आणि तरीही हातात काहीच नाही. हा त्या विद्यार्थ्याचा पराभव नाही, तर त्या व्यवस्थेचा पराभव आहे, जिने त्याच्या कष्टांना दाद देण्यास नकार दिला.
तेरा दिवस उलटून गेले, मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून एक शब्दही आलेला नाही. माफी मागण्याऐवजी मोदी क्षमादान वाटत आहेत. अमित शाह, आम्ही जबाबदारीची मागणी करणे थांबवू, असे समजू नका. राजधानीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांना लाठीमार आणि पेलेट्सने मारहाण झाली आणि तुम्ही एक शब्दही बोलला नाहीत. आज नाही तर उद्या, तुम्हाला या घटनेसाठी उत्तर द्यावेच लागेल. विद्यार्थी हे राष्ट्राचा प्रकाश आहेत आणि मी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे.




