“अमृता फडणवीस म्हणाल्या, घरी जेवायला या”; मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- “मी भाऊबीजेला येईन!”
मुंबई (प्रतिनिधी) : जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. मनोज जरांगे यांचं समाधान होणार नसेल, तर अंतरवाली सराटीला जाणार नाही, अशी भूमिका सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली आहे. मात्र, मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकारकडून युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने मनोज जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आज उपोषणाबाबत मनोज जरांगे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, आज 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना घरी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. अमृता फडणवीस यांच्या या निमंत्रणावर आता मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत. त्यांना मी घरी जेवायला यायचं निमंत्रण देते,'' असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.
अमृता फडणवीस यांच्या या विधानाबाबत आज मनोज जरांगे यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “ताईने सांगितलंय ना. मग जेवायला पण जाऊ. पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भावाला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा.”“मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं. साडीचोळी घेऊन जाऊ,” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
जसे दिवस येतील, तसा संघर्ष करावा लागतो. कुणबी प्रमाणपत्रांची शिबिरं कशी राबवतात, ते बघूया. आंदोलन सुरू आहे म्हणून शिबिरं घेतायत का, तेही पाहू, असंही मनोज जरांगे म्हणाले. सरकारचं शिष्टमंडळ मार्गदर्शक सांगतील त्याप्रमाणे वागतं. शिष्टमंडळ येण्याची मी वाट पाहत नाही. मी मुंबईला जाणार हे निश्चित आहे. 12 तारखेला एकत्र आलो की तारीखच जाहीर करू, असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्याबाबतही मनोज जरांगे यांनी भाष्य केलं. “आधी चांगली भाषा वापरत होतो. तीन वर्षे एकनाथ शिंदेंना चांगलं बोललो. हे जातीच्या नाही, तर पक्षाच्या बाजूने बोलत आहेत. मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदे आणि माझे संबंध खराब झाले,” असं ते म्हणाले. “जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती... त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चूक केली. त्यामुळे मी बोलणार. पक्षाच्या नाही, जातीच्या बाजूने बोलणार,” असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.




