अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला उद्या 1 एप्रिल रोजी कोर्टात हजर केले जाणार असून पोलिस कोठडीचा शेवटच्या दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवसभर अशोक खरात विरोधात आणखी पुरावे गोळा करून तपासला वेग दिला जाणार आहे. अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात खरातचे ओकस कार्यालयामध्ये एसआयटीकडून सोमवारी काही महत्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर करुन या आधीचे चॅटिंग, कोणाशी जास्त वेळा संभाषण केले. कोणाच्या संपर्कात होता काय संभाषण केले याबाबतीत एसआयटी माहिती गोळा करत आहेत. त्यातून नवीन कोणती माहिती समोर येणार, याचा शोध सुरू असून तपासाचा तपशील उद्या कोर्टात हजर केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात काय तपास होतो याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात जास्त चर्चेत राहिल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी येतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजी माजी ट्रस्टींची खरात प्रकणारत चौकशी होणार आहे. अत्याचार प्रकरणात खरातचा तपास सुरू असताना शिवनिका संस्थानच्या कारभाराची देखील चौकशी होणार आहे. काल रुपाली चाकणकर चौकशीसाठी येणार असल्याची चर्चा होती. मात्र रुपाली चाकणकर यांनी आजारपणाचे कारण देत चौकशी टाळल्याची माहिती समोर येत आहे. रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भोंदू अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधींची मालमत्ता आहे. सर्व व्यवहारांची एसआयटी चौकशी करत आहे.




