'अस्पृश्यता बेकायदेशीर, संविधानानुसार गुन्हा'; खरगेंच्या सभेनंतर व्यासपीठाच्या शुद्धीकरणावर राहुल गांधी आक्रमक, मोदींकडे केली मोठी मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर व्यासपीठाचं शुद्धीकरण करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावेत, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. दलितांवर शतकानुशतके अत्याचार होत असून, देशात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.राहुल गांधी म्हणाले की, दररोज हजारो दलितांवर अत्याचार होतात. आमचे पक्षाध्यक्ष मंदिरात जातात, मात्र त्यानंतर तिथे शुद्धीकरण केलं जातं. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन देशाला समर्पित केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री मांझी मंदिरात जातात आणि तिथेही असंच घडतं. हा एक गुन्हा आहे.

ते पुढे म्हणाले की, 8 ऑगस्टला खरगे मंदिरात जातात आणि 10 ऑगस्टला मंदिराचं शुद्धीकरण केलं जातं. 13 ऑगस्टला खरगे म्हणतात की हा गुन्हा आहे. मात्र, उत्तराखंडमधील एका भाजप नेत्याने शुद्धीकरण योग्य असून त्यात काहीही चुकीचं नसल्याचं म्हटलं. या घटनेला 20 दिवस झाले आहेत. अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत हा गुन्हा आहे. त्यामुळे ज्यांनी हे कृत्य केलं आहे, त्यांच्यावर लवकरात लवकर एफआयआर दाखल करावा, अशी आमची मागणी आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, आजही मुलांना शाळांमध्ये झाडू मारायला लावलं जातं. मुलांना विहिरीचं पाणी पिण्याची परवानगी दिली जात नाही. चहाच्या दुकानांमध्ये दोन प्रकारचे कप ठेवले जातात. आजही हजारो दलितांना लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर बसण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ते हेल्मेट घालून घोड्यावर बसतात.
देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक म्हणजे भारताचं संविधान आणि दुसरी म्हणजे भाजप-आरएसएसची विचारधारा, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. समाजात आजही अस्पृश्यता कायम आहे. पंतप्रधान म्हणतात की ते प्रत्येक जातीचे आहेत, मग त्यांच्याच पक्षाचा नेता असं वक्तव्य कसं करू शकतो? पंतप्रधानांनी तातडीने आदेश काढून संबंधितांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.हल्द्वानीमधील ही घटना भाजप आणि आरएसएसची मानसिकता दर्शवते. आम्ही काहीही अशक्य मागत नाही आहोत. अस्पृश्यता हा गुन्हा आहे. त्यामुळे आम्हाला उत्तराखंडमध्ये न्याय मिळाला पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.




