आधी काँग्रेस सोडली, आता शिंदेंची भेट; अकोल्यातील बड्या नेत्याचा निर्णय ठरला? 15 ऑगस्टला चित्र स्पष्ट होणार
मुंबई (प्रतिनिधी) : अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा राजकीय मासा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार असलेल्या डॉ. अभय पाटील यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली असून, पुढील राजकीय निर्णयाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील यांनी तब्बल 4 लाख 16 हजार मते घेत दुसरे स्थान मिळवले होते. तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी डॉ. पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नव्हता.मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही अकोल्यात नुकतीच अभय पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
माध्यमांशी बोलताना अभय पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे मान्य केले. यासोबतच त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वावर जोरदार नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडे निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही ठोस कार्यक्रम आणि यंत्रणा नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना भेटणे ही अतिशय कठीण गोष्ट असल्याचेही त्यांनी म्हटले. आपला पराभव झाल्यानंतर काँग्रेसने कधीही त्याबाबत विचारणा केली नाही किंवा आत्मचिंतन केले नाही, अशी खंतही अभय पाटील यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणतेही कारण नसताना सपकाळ यांनी आपल्याला पक्षाच्या प्रदेश महासचिव पदावरून हटवल्याचे त्यांनी म्हटले आहे. महासचिव पदावरून पदोन्नतीची अपेक्षा असताना कोणतेही पद न देता काँग्रेसने आपली अवहेलना केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या आधीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खऱ्या अर्थाने काम करणारे नेते असल्याचे अभय पाटील म्हणाले. "नाना पटोले हे खमके आणि जबाबदारी स्वीकारणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात ते अनेक वेळा अकोल्यात आले. माझ्या तिकिटासाठी त्यांनी सर्वाधिक प्रयत्न केले," असे अभय पाटील यांनी सांगितले.
तसेच, आता मनधरणी करणाऱ्या काँग्रेसने पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली तरी काँग्रेसचा विचार करणार नसल्याचेही अभय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा स्वीकारल्यास त्यांच्या पक्षात जाण्याचा विचार करू, असे अभय पाटील यांनी म्हटले आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय 15 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी मला तुम्हाला काय हवं, असे विचारले. मात्र, मी स्वतःसाठी काहीही न मागता जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्यासमोर माझा अजेंडा ठेवला. मी मांडलेले विकासाचे मुद्दे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले, तर मी निश्चितच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करेल," असे अभय पाटील यांनी सांगितले.त्यामुळे आता अभय पाटील नेमका कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 15 ऑगस्टला त्यांच्या राजकीय भूमिकेचे चित्र स्पष्ट होणार आहे.




