'आळस झटकून टाका, पेटून उठा'; 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक, मराठा समाजाला मोठं आवाहन

'आळस झटकून टाका, पेटून उठा'; 29 ऑगस्टच्या आंदोलनाआधी मनोज जरांगे आक्रमक, मराठा समाजाला मोठं आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, त्यांनी उद्यापासून म्हणजेच २९ ऑगस्टपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारसह उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले, “संध्याकाळपर्यंत बघू काय होतंय. कुणीतरी आपल्याला भेटायला येईल, या आशेवर समाज मोठा होत नसतो. माझं मराठा समाजाला आवाहन आहे. विखे पाटलांनी काल संभाजीनगरला आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की अर्ज नाहीये. तुम्ही अर्ज दिलेले आहेत, हे मला माहितीय. पण ते आपल्यालाच उलटं बदनाम करतायत. मराठ्यांमध्ये उदासीनता आहे, असं ते म्हणतायत. ते आपल्याला हिणवतायत.”

घरात बसून राहू नका, आपल्या लेकरा-बाळांसाठी बाहेर पडा, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं. “मी वारंवार तुम्हाला सांगतोय, मुलांचं वाटोळं करू नका. आपल्यातला आळस आणि मरगळ सगळी झटकून टाका. ज्या मराठ्यांनी अर्ज दिले, पण जे स्वीकारले गेले नाहीत त्यांनी या. ज्यांची नोंद सापडली, पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही, त्यांनीही या,” असं जरांगे म्हणाले.मनोज जरांगे पुढे म्हणाले की, संध्याकाळपर्यंत सरकार काय निर्णय घेतं ते पाहू. मात्र, आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. ज्यांना भेटायचं आहे ते भेटायला येतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“२९ ऑगस्टच्या आंदोलनामध्ये एकही गोष्ट मागे ठेवणार नाही. देवेंद्र फडणवीस जसं सांगतात, तसं विखे बोलत आहेत. ते सांगत आहेत की मराठ्यांमध्ये उदासीनता आहे. ज्यांची नोंद सापडली तरी अधिकाऱ्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही किंवा अर्ज घेतला नाही, त्यांनी अंतरवालीमध्ये यावं,” असं आवाहन त्यांनी केलं.“आताच चान्स आहे. पाऊस-पाणी नाही, नोकरी नाही. किमान शेतात काही चुकलं नाही तर नोकरीत काहीतरी मिळेल. विखेंना हे दिसत नाही. कलेक्टरला घेऊन बसतात. मी त्यांना सांगितलं होतं, तुम्ही कलेक्टरला घेऊन न बसता तहसीलदारांना घेऊन बसा. एसडीएम आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांना घेऊन बसा,” असंही जरांगे यांनी म्हटलं.

विखे पाटील यांच्यावर टीका करताना जरांगे यांनी त्यांना मराठा समाजाच्या प्रश्नावर गंभीरपणे काम करण्याचा सल्ला दिला. तसेच विखे पाटील, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना इशारा देताना “मराठे चिडले तर तळतळाट घेऊ नका,” असं ते म्हणाले. विखे पाटील यांना उपसमितीवर आणून ठेवलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं ऐकून मराठा समाजाचं वाटोळं करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

“एक वर्ष मी फडणवीस यांना बोललो नाही, शिंदेंना दोन वर्षं बोललो नाही. तुम्ही वाटोळं करत आहात, हे तुमच्या ध्यानात आणून देत आहोत,” असं जरांगे यांनी म्हटलं.विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना जरांगे म्हणाले, “त्यांना काहीच माहित नाही, त्यांना काहीच कळत नाही. त्यांना कारखाना, त्यातून साखर बारीक का जाड निघाली, गूळ निघाला की ढेकळ निघालं, एवढंच कळतं.”

बावनकुळे यांनी केलेल्या एका दाव्याचाही जरांगे यांनी उल्लेख केला. “बावनकुळे २२ लाख म्हणाले. यांना विचारलं तर एवढे नसतील, ते म्हणाले. अन् तुम्हाला मराठ्यांचा देव व्हायचं? इथे तुम्हाला मराठ्यांच्या उपसमितीचा अध्यक्ष केलं. तुम्ही किती वेड्यात काढणार, किती फसवणार आहात?” असा सवाल त्यांनी केला. नोंदींबाबत बोलताना जरांगे म्हणाले की, “५८ लाख नोंदी आम्ही शोधल्या आहेत. हे मीडियासमोर आम्ही वदवून घेतले होते. यांना ५८ लाखांमधील नोंदी कमी करायच्या आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

तसंच विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि लाड भाऊ यांना सावध राहण्याचा इशारा देत “चांगला, योग्य जीआर मराठ्यांना देऊन टाका. नाहीतर तुम्हाला अधिकारामध्ये आम्ही ठेवणार नाही. नाहीतर तुमच्या हातात अधिकार राहणार नाहीत,” असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. मुंबईतील आंदोलनाबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “संभ्रम ठेवत नाही. २९ ऑगस्टला अंतरवालीमध्येच आंदोलन होणार. यांनी दिलं नाही तर मुंबईत होणार. पाच टप्प्यात सहा कोटी मराठा मुंबईत जाणार,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.