*ई-गव्हर्नन्समध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा तृतीय क्रमांक
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये ई-गव्हर्नन्स यंत्रणेच्या वापराबाबत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कोल्हापूर महानगरपालिकेने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या संकेतस्थळे, त्यावरून दिल्या जाणाऱ्या सेवा, अद्ययावत माहिती, मोबाईल ॲप व त्यावरील सेवा, सामाजिक माध्यमांचा वापर आदींचा सखोल अभ्यास करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील पाच वर्षापासून या संस्थेकडून हा उपक्रम राबविला जात आहे.
सन २०२२ मध्ये सिटी ई-गव्हर्नन्स इंडेक्समध्ये कोल्हापूर महानगरपालिका २० व्या क्रमांकावर होती. त्यानंतर सातत्यपूर्ण सुधारणा करत सन २०२३ मध्ये ३ रा क्रमांक, तर सन २०२४ मध्ये २ रा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही कामगिरीत सातत्य राखत महानगरपालिकेने राज्यात तृतीय क्रमांक मिळवून ई-गव्हर्नन्स क्षेत्रातील भक्कम स्थान कायम ठेवले आहे. यंदाच्या क्रमवारीत नवी मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक मिळविला आहे. कोल्हापूर महापालिकमहानगरपालिकेचक्रमांक मिळवण्यासाठी आयुक्त के मंजूलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर रविकांत अडसूळ सिस्टीम मॅनेजर यशपाल राजपूत यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
City E-Governance Index 2026 साठी दि. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महानगरपालिकेने संकेतस्थळ व मोबाईल अॅपचा कार्यालयीन कामकाजात केलेला वापर तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन सेवांचा विचार करण्यात आला. सेवा, पारदर्शकता व उपलब्धता या तीन निकषांच्या आधारे गुणांकन करण्यात आले आहे. संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावर सर्व महानगरपालिकांचे सविस्तर अहवाल नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ https://web.kolhapurcorporation.gov.in/� तसेच ‘myKMC’ हे अधिकृत मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या माध्यमातून घरफाळा व पाणीपट्टी भरणे, जन्म-मृत्यू नोंदणी दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज, नवीन नळ जोडणीसाठी अर्ज, विवाह नोंदणी, व्यावसायिक परवाना नोंदणी व नूतनीकरण, रुग्णालय नोंदणी, अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र आदी विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त +91-7218661181 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना तात्काळ माहिती व सेवा मिळत आहेत. भविष्यात आणखी सेवा ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागरिकांना सुलभ, पारदर्शक व जलद सेवा देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिका सातत्याने प्रगती करत आहे.




