उपसभापती सचिन अहिरांना बंगला नाही, फ्लॅटची ऑफर; 'रायगड' बंगल्यावरून नव्या चर्चांना उधाण
मुंबई (प्रतिनिधी) : विधानपरिषद उपसभापतीपदी नियुक्तीनंतर सचिन अहिर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी कारण आहे त्यांचे शासकीय निवासस्थान. उपसभापतींसाठी राखीव असलेला 'रायगड' बंगला न मिळाल्याने त्यांना फ्लॅट मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला सचिन अहिर यांच्यासाठी 'पुरंदर' बंगला विचाराधीन होता. मात्र, त्याचे वाटप विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना झाल्यानंतर पर्याय बदलण्यात आला. त्यानंतर उपसभापतींसाठी 'रायगड' बंगल्याची चर्चा झाली, पण तो सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याने अहिर यांना अखेर शासकीय फ्लॅट मंजूर करण्यात आला.
विशेष म्हणजे, रविंद्र चव्हाण सध्या मंत्री नसतानाही गेल्या दीड वर्षांपासून 'रायगड' बंगल्यात राहत असल्याने या मुद्द्यावर राजकीय चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, मंजूर झालेला फ्लॅट सचिन अहिर यांनी अद्याप स्वीकारलेला नसल्याची माहितीही समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शासकीय निवासस्थानाचा हा मुद्दा सचिन अहिर लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपसभापतींच्या निवासस्थानाचा प्रश्न आणि 'रायगड' बंगल्यावरील चर्चा आता आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.




