एकनाथ शिंदेंसोबतचा व्हायरल फोटोनंतर,ओमराजे निंबाळकर संतापले
मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असताना, त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या फोटोवरून राजकीय चर्चांना उधाण आलं असताना स्वतः ओमराजे निंबाळकर यांनी समोर येत या फोटोबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. हा जुना फोटो असून तो मॉर्फ करून व्हायरल करण्यात येत आहे, त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा ओमराजे निंबाळकरांनी दिला. बैठकीतील फोटो असेल तर तो समोर आणावा असं जाहीर आव्हानही ओमराजे निंबाळकरांनी दिलं.

ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं की, सोशल मीडियावर वायरल होत असलेला फोटो हा कोरोना काळातील जुना फोटो असून त्यात छेडछाड (मॉर्फ) करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक हेतूपुरस्सर हा फोटो वायरल केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.अशा प्रकारे खोटी माहिती पसरवून दिशाभूल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. लोक अशी तोंडावर पडायसारखी कामं का करतात? असा सवाल करत त्यांनी व्हायरल फोटोचा समाचार घेतला.
गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांना कोणतंही तथ्य नसल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या शिकवणीप्रमाणे आपण काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वतःसह सर्व लोकप्रतिनिधी 24 तास जनतेसाठी उपलब्ध असल्याचं त्यांनी नमूद केलं.
केवळ मेळावे घेण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामं केली, तर जनता आपोआप पाठीशी उभी राहते, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, ऑपरेशन टायगरसंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याचं दिसून आलं. आता ऑपरेशन टायगरची गरज नसल्याचं शिंदेंनी म्हटलं. सध्या राजकीय परिस्थितीच अशी झालीय की साध्या गोळीवरही लोक पक्षात येत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. पंढरपूरमध्ये झालेल्या भगीरथ भालकेंच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.




