ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी नाशिकचं राजकारण तापलं
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा सुरू असून, त्याचे पडसाद आता नाशिकच्या राजकारणातही उमटताना दिसत आहेत. नाशिक महानगरपालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने तातडीने हालचाली सुरू करत संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांना नाशिकला पाठवले आहे. आज त्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आणि नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होत असून, पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही मध्यस्थ नगरसेवकांना प्रभाग विकास निधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून पक्षांतरासाठी प्रयत्न करत आहेत. एका वकिलामार्फत काही नगरसेवकांशी संपर्क साधला जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
या सर्व चर्चांना उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येत आपण पक्षासोबत ठामपणे उभे असल्याचा दावा केला."आमचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही,"असे स्पष्ट करत विरोधकांच्या प्रयत्नांना यश येणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिक मनपामध्ये ठाकरे गटाचे एकूण 15 नगरसेवक आहेत. यापैकी 13 नगरसेवक पत्रकार परिषदेला उपस्थित होते, तर दोन नगरसेवक वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित होते. त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र पक्षावरील निष्ठा कायम असल्याचे सांगितले.
आता सर्वांचे लक्ष रवींद्र मिर्लेकर यांच्या बैठकीकडे लागले आहे. या बैठकीत ते नगरसेवकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेणार असून, पुढील राजकीय घडामोडींवर महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.




