कचोरीत उंदराच्या लेंड्या; मुलांनी दोन कचोऱ्या खाल्ल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशाप्रकारे घाण आणि निष्काळजीपणा आढळल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. मात्र, घरी जाऊन कचोरी उघडल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. खरेदी केलेल्या पाचही कचोऱ्यांमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. धक्कादायक म्हणजे मुलांनी यापैकी दोन कचोऱ्या खाल्ल्याचंही त्याने सांगितलं.
“मी मुलांसाठी या दुकानातून कचोरी घेऊन गेलो होतो. त्यामध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्या. फक्त एका कचोरीत नाही, तर चार-पाच कचोऱ्यांमध्ये त्या सापडल्या. मी कचोऱ्या दुकानात आणून दाखवल्यानंतर त्यांनी ते पार्सल फेकून दिलं. माझ्याकडे ऑनलाइन केलेल्या पेमेंटची पावतीही आहे. आता ते आमच्याकडून चूक झाली, असं म्हणत आहेत. मात्र, आम्ही याची तक्रार करणार आहोत,” अशी प्रतिक्रिया ग्राहकाने दिली.या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाकडून संबंधित मिठाईच्या दुकानावर कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागाच्या कारभारात मोठ्या प्रमाणात सक्रियता दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून राज्यातील विविध भागांत कारवाई आणि धाडी टाकण्यात येत आहेत. या कारवाईत आढळणारे भेसळयुक्त खाद्यपदार्थ नष्ट केले जात असून, संबंधित आस्थापनांवरही कारवाई केली जात आहे.
दरम्यान, साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर त्याचा परिणाम मिठाईच्या दरांवरही होताना दिसत आहे. नाशिकमधील प्रसिद्ध बुधा हलवाई मिठाईचे दर वाढवण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे. प्रति किलो जिलेबीच्या दरात 40 रुपयांची वाढ करण्यात येणार असून, 320 रुपये किलो असलेली जिलेबी आता 360 रुपये किलो होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नाशिककरांना मिठाईसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.




