कल्याणमध्ये डॉक्टर-नर्सवर हल्ला; शिंदे गटाच्या नगरसेवकावर गंभीर आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : कल्याणमध्ये डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला झाल्याचा आरोप शिंदे गटाचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले असून, आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत, कारवाई न झाल्यास संपाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर आमदार आदित्य ठाकरे यांनीही सीसीटीव्ही फुटेजचा उल्लेख करत, आरोपींवर अटक आणि नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी बाळाला जन्मानंतर नवजात शिशु अतिदक्षता विभागाची (NICU) गरज लागू शकते, अशी माहिती नातेवाईकांना दिली. मात्र त्या वेळी रुग्णालयातील सर्व NICU बेड भरले असल्याने, सुरक्षिततेच्या दृष्टीने महिलेला दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला.
याच कारणावरून रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर डॉक्टर आणि नर्सवर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.




