काल विद्यार्थ्यांना रोखलं, आज राहुल गांधींचा पंतप्रधान निवासावर मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणावरून राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सोमवारी विद्यार्थ्यांच्या संसद मार्चदरम्यान झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ आज काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला.

या आंदोलनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक खासदार आणि कार्यकर्ते सहभागी झाले. पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेस नेत्यांनी धरणे आंदोलन करत "पंतप्रधान राजीनामा द्या" आणि "नरेंद्र मोदी डाउन-डाउन" अशा घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान के. सी. वेणुगोपाल यांनी जमिनीवर झोपून निषेध नोंदवला.
परिस्थिती तणावपूर्ण होताच दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींसह अनेक काँग्रेस खासदार आणि नेत्यांना ताब्यात घेतलं. चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटवल्याचं दिसून आलं.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या स्पष्ट केल्या. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, पीडितांच्या कुटुंबांना १ कोटी रुपयांची भरपाई आणि सोनम वांगचुक यांच्यासह सर्व आंदोलकांची तात्काळ सुटका करण्याची मागणी त्यांनी केली. सरकारशी चर्चा करण्याबाबत विचारलं असता, "आता सरकारनेच जंतरमंतरवर येऊन चर्चा करावी, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही," असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारने लाठीचार आणि बळप्रयोगाबाबत उत्तर द्यावं, अशी मागणी केली.




